Thursday, June 09, 2011

आमच्या आठवणीतला ,पहिला पाऊस...

        दिवस नेमका आठवत नाही,पण एप्रिल संपत आला होता.कारण आमच्या बी.ई. च्या लास्ट इयरच्या,लास्ट सेमिस्टर च्या इन्टर्नल ओरल्स जवळपास संपत आल्या होत्या.त्या दिवशी आमची ओरल होती;ती पण आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट कुलकर्णी सरांची.त्यात विषय होता आर्टीफ़िशिअल न्यूरल नेटवर्क थोडक्यात आपल्या मराठीत सांगायचं तर मानवनिर्मित (अनैसर्गिक ) मज्जासंस्थेचे जाळे...ज्याची ए बी सी डी पण निम्म्या क्लासला माहित नव्हती ,अर्थातच आम्हीही त्यातलेच......
        तर आमचे हे सर म्हणजे मी आधीच्या लेखात बोललो आहेच कसे आहेत...भल्याभल्या विद्यार्थी-शिक्षकांचीही टरकायची..असा त्यांचा वचक...अं.. हा..सरांच्या ओरल म्हणजे मुलांची सेमिस्टरमधल्या कर्तृत्वाची कानउघडणी असायची.अशातच भर म्हणजे आख्या क्लासमध्ये आमची बैच  कुप्रसिद्ध .बाकीचे ज्यांच्या ओरल झाल्या होत्या,त्यांचे अनुभव भयानक होते.त्यामुळे आम्ही सकाळपासून घाबरून होतो. अभ्यास काही आम्ही ओरल्सना जन्मात केला नव्हता,पण सरांचा म्हणून थोडा करून पहिला.त्यात सकाळपासून चांगलाच उकाडा जाणवत होता.ढकलत-ढकलत साडेचार वाजत आले..आणि अचानक सगळीकडे अंधारून आलं,अगदी सात-साडेसातचा अंधार असावा तसं...मग हळूहळू वारा सुटायला लागला....मग काय कसला अभ्यास ...गेले तासभर जे काही मनाच्या समजुतीकरता पुस्तक...सॉरी झेरोक्स हातात घेऊन बसलो होतो;तेही बाजूला झालं....आम्ही जवळपास २०-२५ जण होतो आणि हो-हो म्हणता-म्हणता असा जोरदार पाऊस सुरु झाला...
              सर्वजण लाबोरेटारीच्या बाहेर व्हरांड्यात गोळा झाले.इतर आजूबाजूचे विद्यार्थीही आमच्यात सामील झाले.अशातच गारा पडायला सुरुवात...मग काय सगळा विसर पडला ...कुलकर्णी सर..ओरल...
               पण  आजून भिजायला मात्र कुणी गेलं नव्हतं ....इतक्यात काही आमचे वर्ग मित्र-मैत्रिणी ज्यांच्या ओरल्स झाल्या ;ते अगदी एखादी लढाई जिंकून आल्याच्या आविर्भावात पावसात सामील झाले...मुली गारा गोळा करण्यात बिझी होत्या ..मुलं बिना डीजे चा गणपती डान्स करू लागली..
                आमच्या काही मित्रांनी-मैत्रिणींनी आपल्या महागड्या मोबाईलवर फोटो काढायला सुरुवात केली..मग काही आम्हाला राहवेना ...सर काय म्हणतील ?..भिजलेल्या अवस्थेत आत जायचं का ?...सारं विसरून आम्हीही भिजलो,नाचलो,गारा खाल्ल्या...
                  इतक्यात त्या गोंधळात आमचे हजेरी क्रमांक पुकारले गेले.. ८५, ८६, ८८, ८९, ९४..आम्ही पाच बहाद्दर ..आत सरांच्या केबिनमध्ये गेलो.एव्हाना लाईट गेली होती.पण सरांनी  तरीही आसनग्रहण करायला लावले...  मग  सरांनी  एक  एक  करून  प्रश्नाची  सरबत्ती  सुरु  केली ... खरतर  सर्व  काही  पूर्व  अपेक्षितच  होते..पण तरीही केबिनमधून बाहेर येताना फार वाईट वाटत होते...आम्ही आसनस्थ झाल्यापासून बाहेर प्रस्थान करेपर्यंत एकही शब्द उच्चारला नव्हता..शब्दांचा संग्रह सरांचा आहेच प्रगल्भ ...
                    पण हे दु:खही नेहमीप्रमाणे केबिनच्या बाहेर आल्यावर संपते व पुन्हा आम्ही सामील सामील झालो त्या पावसाच्या सरींत...
                     हळूहळू भूका लागायला लागल्या ..मग आमचा दंगा वळला,आमच्या मंजूनाथच्या गाड्यावर...आधीच तिथं फुल्ल गर्दी झाली होती...त्यात आमच्या २० जणाच्या घोळक्याची बेरीज झाली.सर्वांनी भजी-पोह्याची ऑर्डर दिली...दररोजचीच पोहे आणि भजी खाणारे आम्ही,त्या पावसात मात्र भजी-पोह्याची चव काही औरच लागत होती...मग त्यानंतर चहाचा भुर्रका घेताना ..आहा काय मजा आली..काय सांगू...   
                      तिथून मग आमचा ग्रुप निघाला हॉट-फेवरेट स्पॉटला ,लायब्ररीच्या समोरच्या कट्ट्यावर..आमच्या समोरच कौलेजच्या मुला-मुलींचा मोठा ग्रुप पाय-यांवर बसला होता. कुणीतरी आधीच होस्टेलवरून डिजिटल कॅमेरा मागवला होता...तो पण आला..मग काय सुरु फोटो काढायला..ह्या ठिकाणी-त्या ठिकाणी ....   
                       बराच वेळ पाऊस सुरु होता..खरतर जोर कमी झाला होता.पण रिपरिप सुरु होती...दंग्यात मात्र काही फरक पडला नव्हता.मग हळूहळू आम्ही पाऊले होस्टेलकडे उचलायला सुरु केली..वाटेत बरेच आमचे होस्टेलवरचे मित्र घोळक्या-घोळक्याने येत होतेच..पण पाऊस पूर्णपणे थांबेपर्यंत आमच्यापैकी कुणीही आत रुममध्ये गेलं नव्हतं...
                       सांगलीत खरंतर ४ पावसाळे पहिल्या वर्षापासून-शेवटच्या वर्षापर्यंत अनुभवले पण ह्या पावसाचा अनुभव औरच होता..आजही पाऊस आला कि,सर्व ते पावसात भिजतानाचे क्षण, केबीनमधले ओरलचे क्षण, होस्टेलवर भिजून गेल्यावर थंडीत रुममध्ये वाटणारी ऊब...अगदी आजही तशीच वाटते...   

8 comments:

  1. खर्रच.....आजही पाऊस आला कि आपल्या वेड्या मित्रांची खूप आठवण येते.

    ReplyDelete
  2. Massst writer Mr. Aniket...

    ReplyDelete
  3. chala parat kau paavasaat bhijayla ..

    ReplyDelete
  4. good anya..... i think the date was 16 april

    ReplyDelete
  5. तुज लेख वाचून जुन्या मंतरलेल्या दिवसांची आठवण झाली मित्रा .........

    ReplyDelete
  6. Such a great.👍👍👍
    Thanks sir

    ReplyDelete