Saturday, August 24, 2013

किल्ले राजगड मुक्कामी ट्रेक- एक भन्नाट अनुभव - १

        २०१२ मधला पहिला ट्रेक झाला तो क्लब  डोंगरयात्राबरोबर भोरगिरीचा , तो पण मुक्कामी .एक नवीनच अनुभव होता तो. मंदिरात मुक्काम, रात्री ७.३० वाजता भीमेच्या डोहात डुंबणे ,उशीरपर्यंत जागून गप्पा-खेळांमध्ये रात्र काढणे , धबधब्यावर आंघोळ करणे ह्या गोष्टी माझ्याकरता नक्कीच नव्या होत्या आणि काहीतरी नवीन करतोय ह्याच विचाराने आतून खूप गुदगुल्या होत होत्या. मनात सारखं-सारखं येत होतं , आपल्या मित्रांना पण जर हे वेड लावलं तर …. काय धमाल येइल….ह्या विचाराने मी नुसता झपाटून गेलो होतो . राजगड, तोरणा,पुरंदर,लोहगड,राजमाची,रोहीडा,रतनगड नुसती असली नावे डोळ्यासमोर येत  होती…सारखं वाटत रहायचं कुठला तरी गड चढतोय … कुठल्यातरी गडावरून सूर्यास्त बघतोय…अगदी अशा जागी जिथे कुठे रोजच्या सिमेंट-कौन्क्रीटच्या इमारती नाहीत,लोकांची गर्दी नाही,कसलीच गर्दी नाही,फक्त आपणच…हे प्रवासवर्णन लिहिताना ते वाढत चाललंय ह्याची जाणीव वहीवर लिहित असताना झाली म्हणून तो ब्लॉगवर टाकताना २ भागात पोस्ट केलाय …
         बघता-बघता राजगड ट्रेक ठरला…गडांचा राजा आणि राजांचा गड अशी ज्याची ख्याती आहे.राजगडाबद्दल इंटरनेटवर बरंच वाचून ठेवलं होतं कि…सिंहगड हा सिंहाची गुहा आहे तर राजगड हा पंख पसरलेला गरुड. राजगडाचे हेलीकॉप्टर मधुन काढलेले फोटो पहिले होते आणि मी राजेंच्या गडाच्या प्रेमात पडलो होतो आणि जेव्हा राजगड प्रत्यक्षात पाहिला त्याची अवाढव्यता ,त्याची व्याप्ती ,महाराजांनी दूरदृष्टीने त्याची केलेली रचना आणि हो ते नेढहि … तेव्हा कळलं कि हा राजगड इतक्या जणांचा आवडता का आहे… पण त्या ट्रेक वरून निघताना खूप रुखरुख वाटत होती . पद्मावती माची , बालेकिल्ला पाहणे आणि फोटो काढणे ह्यातून पूर्ण किल्ला पाहताच आला नव्हता… सुवेळा, संजीवनी माची पाहिली नाही. पण मनोमन पुन्हा नक्की यायचं मात्र मी ठरवलं होतं. ह्या ट्रेक नंतर लोहगड झाला, मल्हारगड ,पुरंदर झाला … ह्या काळात मी माझ्या मामांना भेटलो आणि माझ्या ह्या नव्या वेड/छंद बद्दल बोललो तेव्हा ते अर्थातच खुश झाले .कारण त्यांनाही हि आवड आहे आणि त्यांच्याकडून मला काही माहितीही मिळाली आणि मग राजगडावरून-तोरणा ट्रेक करायचा ठरवला .         त्यानुसार मी माझ्या हालचाली सुरु केल्या.सर्वांना ई-मेल फिरवले.काहींचे रिप्लाय आले, काहींच्या उदासीनतेमुळे मीही काहीसा उदास झालो.…चिडलोही पण त्याचा काही फायदा होणार नाही हे माहित होतं…म्हणून मी माझे प्रयत्न थांबवले नाहीत आणि मी विशेष उत्साही असण्याच मुख्य कारण म्हणजे हा ट्रेक मुक्कामी करायचा ठरवलं होतं. एक कच्चा प्लान ठरवला…आणि ह्यावेळी महामंडळाच्या लाल डब्याने जाणं भाग होतं. हो-नाही म्हणता म्हणता सुमित,सुश्या,विज्या,अमल्या बालटें,राहुल बालटें आणि मी ६ जण ठरलो. साग्या वेल्हाळनं आणि सुह्याने ऐनवेळेला कल्टी मारली. :(         १३ ऑक्टोबरच्या दिवशी जायचं ठरलं … अर्थातच शनिवार-रविवार बघुन..दुपारी १:३० वाजताची स्वारगेट -गुंजवणे येष्टी होती आणि १:१५ ला सर्वांनी स्वारगेट ला एकत्र यायचं. निघताना चार-दोन घास कसेबसे खाऊन निघालो आणि काही बांधून घेतलं.आम्हाला कुठं वेळेवर पोहोचायला कधी जमलंच नाही… बाणेर फाट्यावरून नशिबाने २१ नं. स्वारगेट मिळाली तर मंडईच्या पुढे हे ट्राफिक लागलं कि मला तर वाटायला लागलं येष्टी सुटते का काय ?? पण परत नशिबानं वेळेवर पोहोचलो …तिथं पोहोचल्या-पोहोचल्या सुश्यान गडावर खायला म्हणून घेतलेली केळी तिथच संपवली. १:३५ वाजून गेले तरी येष्टीचा काही पत्ता नव्हता.चौकशी केल्यावर नेहमीचं उत्तर मिळालं 'येईल येईल… थांबा तिथं'…जवळपास १:४५ नंतर येष्टी एकदाची फलाटाला लागली. सर्वजण लगबगीनं चढून बसले आणि प्रवास सुरु झाला. ग्रामीण भागात जाणारी येष्टी म्हणजे खिळखिळी झालेली असा माझा समज तसा दूर करणारीच होती.प्रवासात तशा काही जास्त गप्पा झाल्या नाहीत,जाताना वाटेत घाटात उमललेले भगव्या रंगाचे फुलांचे सडे तेवढे सर्वजण एकमेकांना दाखवत होतो.
         गेल्या वेळेला दाट धुकं असल्यामुळं उंची खोली-अंतर याचा काही अंदाज आला नव्हता आणि संपूर्ण वाट पावसानं घसरडी झाल्यामुळ आमच्या सगळ्या मंडळींची चांगलीच धांदल उडाली होती.ह्यावेळी गप्पा-टप्पा मारत, कुणाला टोमणे मारत …पद्मावती माचीचा चोर दरवाजा आवाक्यात आल्याचा अंदाज आला. ह्यावेळी विज्याला आधीच ग्लुकोज घ्यायला लावलं होतं त्यामुळं काहीच प्रश्न नव्हता आणि अखेर सूर्य अगदी मावळतीच्या बाजूला पूर्ण कललेला दिसला…फक्त लाल-गुलाबी फिकट गोळा दिसत असताना आम्ही राजगडावर प्रवेश केला . सूर्य अगदी तोरण्याच्याच बाजूला होता. मी पटकन ३-४ सूर्यास्ताचे आणि तोरण्याचे फोटो काढून घेतले. मस्त थंड वारा सुटला होता. सगळी मंडळी जे का पिशव्या टाकून तिथं बसली ते संपूर्ण अंधारल्यावरच उठली. खरंतर मुक्कामाची जागा  शोधण्याचा प्लान फिस्कटला होता,कारण मलाही शीण आल्यानं मीही सर्व विसरून तिथंच पडून होतो.
          जवळपास अर्धा-पाऊण तास तिथला आराम उरकून आता मात्र तिथून निघणं भाग होतं. आम्ही राजगडावर आल्यावर एक श्वानरूपी महाशय येऊन मिळाले त्यांनी  आमची पद्मावती मंदिरापर्यंत साथ दिली, आम्हाला तर जणू असंच वाटत होतं कि ते आम्हाला वाट दाखवत आहेत आणि त्यांच्यातल्या इतर भिडूंना आमच्यापासून दूर ठेवत आहेत. मंदिराच्या बाहेर एक काका-काकू रात्रीचे जेवण चहा-पाणी तयार करत बसले होते.ते पाहताच आम्हाला हायसं वाटलं. मंदिरात प्रवेश केल्यावर आत बी.जे.च्या मुला-मुलींचा २५-३० जणांचा ग्रुप दिसला. ह्या भाऊ-गर्दीत आम्ही आमची मुक्कामाची जागा सुरक्षित केली. मंदिरात बराच गोंधळ चालू होता , त्यामुळं सर्वजण बाहेर आलो.रात्रीच्या जेवणाची सोय तर झाली होतीच. बाहेर येऊन पटांगणात बसलो. ब-याच गप्पा झाल्या. सुशांत उर्फ सावकारांची सभा ब-याच दिवसांनी  भरली होती. इतिहासाच्या गप्पा झाल्या भूगोलाच्या गप्पा झाल्या. प्रत्येकाची कॉलेजमधली 'ती' तिच्यावरही गप्पा झाल्या. खासकरून सुम्या सुशाच सोफ्ट टार्गेट….            काही ग्रुप नाईट ट्रेक करून गडावर पोहोचले. आम्हाला जरा चिंता वाटायला लागली कि आमची मंदिरातली जागा धोक्यात येते कि काय ? पण ते अनुभवी आणि माहितगार वाटले,त्यांनी पद्मावती मंदिर आधीच भरलेलं पाहून पर्यायी जागा शोधल्या. शासकीय विश्रामगृह,रामेश्वर मंदिर इत्यादी.  सुरवातीला मला वाटलं होतं रात्री मुक्कामाला फार तर फार किती ३-४ ग्रुप असतील …३०-४० लोक…पण इथं तर असं वाटायला लागलं जणू १०० एक जण तरी असतील …रात्र वाढायला लागली …८.३०-९.०० च्या आसपास आमची पिठलं-भाकरी आली. …आणि बरोबर कांदा-ठेचा …भूका लागल्यामुळे सर्वजण जेवणावर तुटून पडले…राजगडचा काही इतिहास माहित होता,जेवढा वाचण्यात आला होता…म्हणून त्या काकांनाच विचारलं तेव्हा त्यांनी काही माहिती सांगितली…कि हा पूर्वी ब्रह्मगड म्हणून म्हणून डोंगर होता …आणि मोक्याच्या जागेवरच ठिकाण म्हणून महराजांनी 'राजगड' बांधला  आणि त्याला आपली स्वराज्याची पहिली राजधानी बनवली.'बालेकिल्ल्यावरून १२ किल्ले दिसतात' अशी माहिती सांगितली. आम्ही थोडंफार दिशेनुसार पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा सिंहगड व पुरंदर तिथल्या टोवर्समुळे ओळखले.             जेवणं उरकून थोडा वेळ तिथंच चांदण्या पाहत पडून राहिलो… नंतर किल्ल्यावर थोडा फेरफटका मारावा म्हटलं…बालटेशिवाय कुणाकडून काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही…टोर्च घेऊन आम्ही निघालो…सर्व घोळक्यांची झोपेची तयारी सुरु असल्यानं कुजबुज सगळीकडं चालली होती. बालेकिल्ल्याच्या बाजूला आम्ही दोघे निघालो होतो…वाटेत सरपटणा-या प्राण्यांची चाहूल लागत होती. रात्रीच्या वेळी किल्ल्यावर त्या थंडीत फिरताना एक थ्रिल वाटत होतं …अगदी सांगता येणार नाही पण मनाला एक विशिष्ट मौज वाटत होती… पण उगाचच काही धाडस नको म्हणत जास्त पुढं न जाता माघारी परतलो…एव्हाना मंदिरातली बरीचशी मंडळी झोपली होती. सकाळी लवकर उठायचं होतं त्यामुळं आम्हीही निद्रादेवतेच्या अधीन झालो.तरी रात्री उशिरापर्यंत बरेचजण जवळपास जागे असल्याची जाणीव होत होती.झोपायची तशी माझीपण इच्छा नव्हती पण दुस-या दिवशी भरपूर पायपीट करायची होती त्यामुळं शेवटी झोपलो.           
किल्ले राजगड मुक्कामी ट्रेक- एक भन्नाट अनुभव - २x

       

        गुंजवण्यात पोहोचेपर्यंत ३ वाजले होते. सर्वाना भूका लागल्याच होत्या, त्यामुळे पायथ्याला जेवण करण्याचा निर्णय घेतला. अर्धा-पाउण तास जेवण-आराम होईपर्यंत ४ वाजले. खाली त्या हॉटेलमध्ये 'राजगडाचे' वेगवेगळे फोटो होते ते पाहिले आणि गड चढायला सुरुवात केली. दुपारची वेळ, ऑक्टोबर हीट जाणवत होती आणि त्यात ह्या वेळी पिशव्या जड होत्या, कपडे,पाणी इ. मुळे चढायला जड जात होतं. ठराविक अंतरावर विसावा घेत घेत आमचं राजगडरोहण सुरु होतं. अधून-मधून फोटो काढत-काढत अंतर कापता-कापता नेढ्याकडे पाहत ह्यावेळी नेढ पाहायला मिळणार ह्या आनंदात होतो. जस-जसा सूर्य मावळतीकडे चालला होता…मी भराभर पावलं उचलायला लावत होतो जेणेकरून गडावरची मुक्कामाची जागा नक्की झाली असती आणि गडावरून सूर्यास्त पाहायला मिळाला असता. मध्यातून तोरण्याच दर्शन झालं.