Wednesday, May 17, 2017

खांडस (कर्जत) ते भीमाशंकर- एक रोमांचकारी अनुभव

         जून महिन्यानुसार जावं तर तसं पावसाळा सुरु झाला होता, पण चालू झालाय असं मात्र म्हणता येत नव्हतं. बऱ्याच दिवसांपासून एक मस्त ट्रेक आम्हाला खुणावत होता, कर्जत ते भीमाशंकर....जूनमध्ये ह्या भागात पाऊस असणारच हे माहित असल्यामुळे तयारीला लागलो...चाल-ढकल, रुसव्या-फुगव्यानंतर अखेर ११-१२ जुलै तारीख ठरली. राहुल्याने कल्टी मारलीच...७ जण होतो - प्रण्या, सुम्या, योग्या, सुह्या, साग्या, स्वप्न्या(खास ट्रेकसाठी कोल्हापूरहून) आणि मी. सकाळी जितक्या लवकर निघता येईल निघणं भाग होतं..६च्या  सिंहगडसाठी कुणी तयार होणार नाही माहित होतं, So, ७:५० ची 'प्रगती' पकडायची ठरलं. प्रण्या मुंबईहून कर्जतला येणार होता. पहिल्यांदाच ट्रेकला येणाऱ्या स्वप्न्याला, ट्रेकिंगचे अंतर वाढवून सांगून घाबरवण्याचे राहुल्याचे सारे प्रयत्न आम्ही हाणून पाडले.    
       सकाळी ६:१५ ला गजर वाजले, कसेबसे उठले सगळे....आदल्या रात्री कोरड्या खाऊची बरीच पाकिटं आणली होती.. बिस्किटं, भडंग, खारे शेंगदाणे, चिवडा वगैरे... त्यामुळं बॅगा जड झाल्या होत्या..७-७:१० झाले तरी सगळे घरात.. माझं आणि साग्याचं आवरलं होतं मग आम्ही पुढे जाऊन ट्रेनची तिकिटं काढायची ठरलं ...त्यानुसार आम्ही शिवाजीनगर स्टेशनला ७:२०ला आम्ही तिकिटं घेऊन तयार होतो पण रुमवरून मंडळी अजून निघाली नव्हती...आम्ही पुणे स्टेशनला आंबेडकर चौकात पोचलो...७:३०..७:३५..७:४०.. तरीही चौघं दिसेनात.. आता मात्र चिडचिड व्हायला लागली.. इतक्यात ते आले ..गाड्या पार्किंगमध्ये पार्क केल्या आणि अक्षरश:धावतच निघालो..बॅगा भरलेल्या असल्याने धड पळताही येईना.. त्यात अजून भर म्हणजे 'प्रगती' प्लॅटफॉर्मला already लागलेली...तसंच दादरवर धावत असताना गाडी थांबलेली दिसली तेव्हा कुठे हायसं वाटलं..पण  हा आनंद क्षणिक होता..पायऱ्या उतरेपर्यंत ट्रेन सुरु झाली..तसंच प्लॅटफॉर्मवर धावत धावत ट्रेन पकडू लागलो..पण 'प्रगती' म्हणजे खचाखच भरलेली  असते..पाय ठेवायलाही जागा मिळेना..तसंच कसंबसं चढलो.. सगळे वेगवेगळ्या डब्यात..साग्या-सुह्या एकत्र..योग्या, स्वप्न्या आणि सुम्या एकत्र आणि मी तिसरीकडेच..अशा भरगच्चं डब्यात, जवळ भरलेली बॅग सांभाळणं म्हणजे महाकठीण.. अशा तऱ्हेने आमच्या ट्रेकची सुरुवातच थ्रिल्लिंग झाली होती.. कामशेत गेल्यावर कुठं जरा बरं वाटायला लागलं..लोणावळ्यात बाकीच्या मंडळींना बसायला/कमीत कमी नीट उभा रहायला जागा मिळाली पण माझ्या वाट्याला काही ते सुख नाही आलं.. ट्रेनने लोणावळा सोडल्यावर जी हिरवाई.. ढग..धबधबे दिसू लागले तसा मूड बनायला सुरुवात झाली...      
(कर्जत स्टेशनाबाहेर काढलेला ग्रुफी )

(खांडस पासून प्रवास सुरु करतानाचं जंगल)
        ९:२०-९:३० च्या आसपास कर्जत स्टेशनला पोचलो..प्रण्या आधीच पोचला होता..स्टेशन बाहेर भरपेट नाष्टा केला.. स्टेशनबाहेर एक Groupfie काढून FBवर check-in करून खांडसच्या दिशेने पावलं उचलली...बाहेर बसस्टॅन्डवर काशिळकडे जाणारी येष्टी पकडली..काशीळमध्ये उतरून तिथून प्रवासी ट्रॅक्सने खांडसचा रास्ता धरला..त्या ट्रॅक्सने आम्हाला एका टपरीपाशी सोडलं...तिथला पाणचट मसाला चहा पिऊन...आरोळ्या ठोकत खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरुवात केली...जिथे चहा घेतला तिथून 'कलावंतीण महालाचा' बुरुज स्पष्ट दिसत होता, तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली..ट्रेक सुरु केला तेव्हा हा बुरुज डाव्या बाजूला होता, पण ट्रेकच्या आराखड्यानुसार तो उजव्या हाताला लागायला हवा होता.. त्यामुळे थोड्याशा संभ्रमावस्थेतच चालत होतो...सोबत आपली क्लिकोग्राफी चालू होतीच वेगळं सांगायला नको...फारफार तर २०-३० पावलं चाललो नसेल तोच जोराचा पाऊस सुरु झाला..तसंच चालणं चालू ठेऊन १५-२०मी.नी पहिला ब्रेक घेतला. तिथून ५च मिनिटांत गणपतीचं देऊळ लागलं ..काठेवाडीतलं..
(विश्रांती क्र.२ - गणपती मंदिर)
(काठेवाडीचं गणपती मंदिर)
    तिथं पोचल्यावर लक्षात आलं, आम्ही Default 'गणेश घाटा'लाच लागलोय कारण नेटवर search केल्याप्रमाणे खांडसमधून आम्हाला २ मार्ग होते 'गणेश घाट' जो डोंगरांना वळसा घालून आहे आणि 'शिडी घाट' जो अवघड व चकवा देणारा...पण थोड्या कमी अंतराचा आहे...  
        एव्हाना खांडस गावापासून बरंच पुढं आलो होतो...दूरपर्यंत कुठंच गाव दिसत नव्हतं..दिसत  होती ती फक्त दाट वृक्षराई  आणि उंचच उंच डोंगररांगा..बाप्पाच्या पाया पडून तिथून पुढच्या प्रवासासाठी प्रस्थान केलं...मजल-दरमजल करत ..फोटो काढत..कुण्या हौशी आणि भल्या गिर्यारोहकांनी (ट्रेकर्स) फसव्या वळणांवर भीमाशंकरकडे जाणाऱ्या वाटेच्या दिशेच्या खुणांचा पाठलाग करत प्रवास चालूच होता. कधी घनदाट जंगल..इतकं कि पूर्ण अंधार जाणवायचा तर कधी उघडा माळ ..जिकडे छोटी-मोठी झुडपं असायची... तर कुठे डोंगरावरून वाहत आलेले सुंदर, खळखळत वाहणारे झरे...

(वाटेवरच्या वाटा)
(वाटेवरच्या वाटा)
 हे सारं काही चालण्याचा शीण घालवत होते. ह्या साऱ्या प्रवासातल्या ज्या पाऊलवाटा होत्या..त्या ही खूप सुंदर झाल्या होत्या...अगदी Wallpaper ठेवण्याजोग्या...
(एक निवांत क्षण - मागे कलावंतीण महाल )
        थोड्या वेळात 'कलावंतीण महाल' तथा पदरगडाच्या पायथ्याच्या पठारावर येऊन पोचलो. तिथे एका छोट्याशा घरात सरबत, चहा वगैरे घेऊन हा विश्राम आटोपला. हि जी टप्प्या-टप्प्यांवर छोटी-छोटी घरं असतात चहा म्हणा..ताक म्हणा..सरबत वगैरे पुरवणारी..हि खरोखरच साऱ्या आमच्यासारखा हौशी-गौशी ट्रेकर्ससाठी उपयोगाची ठरतात, ऊर्जा पुरवणारी.
(सरबताची वाट पाहताना- योग्याचा कॅमेरा इथेच पडला)
(शिडी घाटाचा कडा)

तर तिथून निघतच होतो,इतक्यात योग्याच्या कॅमेऱ्याला अपघात होऊन तो निकामी झाला..तसा तो थोडा उदास झाला..पण काही क्षणातच एक Photo काढण्याजोगा spot आला आणि साहेब pose देऊन ऐटीत उभे. आम्हालाही बरं वाटलं, आम्हीही भरपूर फोटो काढले आणि मार्गस्थ झालो. अजून बराच प्रवास राहिला होता..कलावंतीण महालाच्या पहाडाला वळसा घालून पुढे निघालो..वळसा घातल्या घातल्या जे निसर्गाचं रूप दिसलं ते पाहून आम्ही थक्क झालो. समोर उंच डोंगर , डाव्या बाजूला सरळ-थेट खाली दरीत जाणारा कातळ..उजवीकडे कलावंतीण महालाचा पहाड...निव्वळ अप्रतिमच ! थोडंसं नीट
(कलावंतीण महाल )
पाहिल्यावर लक्षात आलं..डावीकडं जो सरळ-थेट कातळ होता त्यात शिड्या दिसल्या..मग कळलं ते दुसरं-तिसरं काही नसून 'शिडी घाट' होता. आता शिडी घाट आणि गणेश घाट दोन्ही वाटा एकत्र येत होत्या.कधी भली मोठी जंगलातून जाणारी वाट-कधी फक्त एकजण जाऊ शकेल अशी  डोंगराच्या कडे-कडेने जाणारी वाट...प्रवास आता शेवटच्या टप्प्यावर आला होता. अर्थातच 'Athlete प्रणव' सर्वात पुढे होता. ऊन-सावलीचा पाठशिवणीचा खेळ संपूर्ण प्रवासात चालू होताच.
(दाट झाडीतून वाट काढताना )
(एक मस्त फोटो)
शेवटचा टप्पा थोडासा अवघड होता...पावसामुळे निसरड्या झालेल्या..काहीशा तिरक्या उताराच्या वाटेने वरती चढायचं होतं..वातावरण तर खूपच मोहक झालं होतं..ढगांनी पूर्ण गर्दी केली होती...
(फोटो पाहून कल्पना येत असेल वातावरणाची :))
काही ठिकाणी धुकं होतं..खाली दूरवर पसरलेली हिरवाई..कुठे ढगांत गुडूप होणारे डोंगर..विहंगम दृश्यच ते..हा टप्पा पार केला आणि भीमाशंकराच्या डोंगररांगेच्या माथ्यावर येऊन पोहचलो..वर अजिबात काही समजत नव्हतं कि काही दिसत नव्हतं..फक्त  आकाराची झाडी,पाण्याची तळी..आणि धुकं..अशातच दिसणाऱ्या पाऊलवाटेनं आम्ही १०-१५ मि. चालल्यावर आम्ही ज्योतिर्लिंग शंभू महादेवाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो..तिकडे फोटो काढला,पण सगळेच जण थकलेले असल्यामुळे सर्वानुमते दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर दर्शन घेण्याचा ठराव पास करून मुक्कामासाठी जागा शोधायला निघालो...      
(प्रवेशद्वार)

       


(दिशादर्शक फलक)
     प्रण्या-योग्या MTDC चं resort वगैरे आहे का पाहायला गेले, बाकीचे सारे तिथेच पार्किंग पाशी रस्त्याच्या बाजूलाच ठाण मांडून बसलो..जसजसा अंधार वाढू लागला तसतसं हवेतला गारवा वाढला..सुहयाला आदल्या दिवशी ताप होता म्हणे पण एवढ्या प्रवासानंतर पण त्याच्या चेहऱ्यावर तसा काहीच लवलेश नव्हता. पण कसं काय कुणास ठाऊक, मलाच हुडहुडी भरायला लागली..त्यात अंगावर ओले कपडे..खोल्या मिळाल्यानंतर तिकडे जाईपर्यंत तर तापमान बरंच वाढलं.. खोलीत गेल्या-गेल्या अंगावरचे भिजलेले कपडे, मोजे-बूट काढून हात-पाय धुवून सगळे तसेच खाटांवर आडवे झाले..गप्पा-टप्पा सुरु केल्या होत्या..मी आपला मिळेल ते पांघरूण-टॉवेल घेऊन ऊब मिळवण्याचा प्रयत्न करत होतो. एव्हाना सर्वाना भूका लागायला लागल्या होत्या. सर्वजण गप्पांच्या ओघात किती वाजलेत विसरले होते. रात्री ९-९:१५ नंतर जेवायला निघालो..मला तापामुळं काय खायची इच्छा होत नव्हती पण सगळ्यांनी 'खाल्ल्यावर बरं वाटेल'चा सूर लावल्यावर कसाबसा निघालो..अंगात अवसानच नव्हतं..गावात एवढ्या रात्री मोजकीच हॉटेलं चालू होती..एक सापडलं आणि ठीकठाक वाटणारं होतं. बऱ्याच विचार-विनिमयानंतर शेवभाजी आणि पनीरची कुठलीशी भाजी ऑर्डर केली...अपेक्षेप्रमाणे एकाच मसाल्यात दोन वेगवेगळ्या भाज्या आणल्या आम्हीही त्या रिचवल्या आणि माघारी खोलीवर आलो..
          खोलीवर जसा आलो तसा, सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरंच माझा ताप कुठल्या कुठे पळाल्या..आल्या आला आराम झाल्यामुळं आणि आता पोटं भरल्यामुळे सगळेच जण एकदम फ्रेश झाले होते. मी पुण्यातून रुमवरून निघताना पत्ते आणलेच होते..मग काय रमी , मुंगूस, चॅलेंज..बदाम सात वगैरे नावं सुचवली गेली आणि साधं सोपं 'बदाम सात'वर Done झालं. एक-एक डाव खेळता-खेळता..मैफिल रंगली..सोबत एकमेकांची उणी-दुणी..मापं काढणं..टोमणे मारणं आपलं चाललेलंच. रात्र जशी मध्यरात्रेकडे सरली..तसं काहीजण वेगळं काही खेळुयात म्हणाले..अस्मादिकांनी (स्वतः) आपला आवडता 'दमशेराज' सुचवला आणि मान्य करवून घेतला. स्वप्न्याला काय प्रकार जास्त माहित नव्हता.पण खेळ पुढे गेला तसे सगळेच खेळात Master झाले. दमशेराज खेळताना आपल्या संघातल्याला Movie च नाव समजावताना Hindi/Marathi..Latest/Old..Hero/Heroine कोण समजावताना काही नवनवीन अशक्य क्लृप्त्या सुचवल्या गेल्या..हाहाहा .. जे तेव्हा होते आणि हे वाचतील त्यांना चिक्कार हसू येणार आहे..आणि कायम जेव्हा कधी आठवेल तेव्हाही..२:३०-२:४५ च्या आसपास कुठे खेळ थांबवला गेला..सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून फक्त..साग्या तसा सवयीनं थोडा आधीच कलंडला होता.. आम्हीही टवाळक्या करत करतच झोपी गेलो...
          सकाळी लवकर कधीतरी प्रण्या उठला..आवरलं आणि सगळ्यांना एकएक करून उठवलं..सगळे कसंबसं उठले आणि आवरू लागले.. एवढ्यात त्याचा चहा-बिस्किटाचा एक round झाला होता..आम्हीही पटापट आवरण घेतलं..नेहमीप्रमाणे शेवटी मीच होतो अर्थात सगळं सामान नीट घेतलं कि नाही..खोलीतलं सामान जागेवर गेलं कि नाही..हे सर्व पाहण्यात बराच वेळ गेला. एव्हाना कालपासून बॅगा जरा हलक्या झाल्या होत्या..थोडी बिस्किटं भडंग खारे शेंगदाणे वगैरे संपलं होतं..खोलीपाशीच प्रण्यानं टपरी बघून ठेवली होती, तिथं ठीकठाक पोहे आणि बेचव चहा संपवून ..'आधी पोटोबा मग विठोबा'(इथं महादेव :P) नुसार बॅगा खोलीवर ठेवून दर्शनाला गेलो..बऱ्यापैकी गर्दी होती..पण जितकी ९-१० नंतर असते तितकी नव्हती..सोबत झिरमिर पावसाची धार होतीच..'मंदिरासमोरची  चिमाजीआप्पानी वसईच्या विजयानंतर आणलेली घंटा' ह्या विषयावर अस्मादिकांकडुन Knowledge पाजळून झालं..आणि 'भीमाशंकराच्या' पाया पडून..मंदिर परिसरात थोडेफार फोटो काढून..माघारी खोलीवर आलो..
(मंदिरातली घंटा )
(मंदिराचं शिखर)
    आता बघायची ठिकाणं ३ होती..नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर आणि भीमेचं उगमस्थान..ह्यात सुरुवात नागफणी पॉईंटपासून करायची ह्यावर एकमत करून बॅगा उचलल्या..खोलीचं भाडं वगैरे खर्च देऊन नागफणीकडे कूच केलं..            
         हा नागफणी पॉईंट, मंदिराच्या ईशान्येकडे गेल्यावर लागतो.हा पॉईंट म्हणजे त्या परिसरातलं सर्वोच्च शिखर आहे (बहुदा)..भीमाशंकरच्या घनदाट अभयारण्यातून जावं लागतं ...आणि हा शिखराचा भाग बाकीच्या डोंगरापासून नागाचा फणा उचलल्याप्रमाणे दिसतो म्हणून त्याला नागफणी पॉईंट म्हणत असावेत. जसं भीमाशंकर मंदिराचा परिसर सोडून नागफणीकडे निघालो, तसं रहदारी/गर्दी कमी होत गेली...खरंतर आम्ही वाट दिसेल तसं फक्त समोर नागफणीचा डोंगर पाहून चालत होतो. काही Duke, Bullet तत्सम दुचाकींवरून दुचाकीस्वार आम्हाला पार करून पुढे गेले. एक छोटा टप्पा पार केल्यावर आम्ही अशा ठिकाणी  पोचलो, जिथून पुन्हा गर्द झाडी सुरु होणार होती. मागला टप्पा तसा छोट्या-मोठ्या झुडपांचा होता. उजवीकडे २ माध्यम आकाराच्या टेकड्या आणि समोर दूरवर पसरलेलं घनदाट जंगल. झाडीतून येणारा किर्रर्र आवाज...अधून मधून येणारे प्राण्यांचे आवाज...एक गूढ वातावरण तयार करत होते...
(नागफणीकडे जाणारी वाट)
स्वप्न्या थोडा आधीच घाबरला होता...१५-२० पावलं चाललो नसेल तोवर एक माकड रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसलं..तसं मंदिराच्या आसपास भरपूर माकडं असतात पण हे माकड आम्हाला पाहून झाडीत पळून गेलं. आम्ही तसंच पुढं चालत निघालो असतानाच अचानक चित्र-विचित्र आवाज करत छोटी-मोठी ५-६ माकडं झाडांवरून जमिनीवर उड्या मारत आली. जणू मघाशी बाकीच्यांना सावज आलं असल्याची वर्दी द्यायला ते गेलं होतं. काही कळायच्या आत त्यांनी आमच्या हातातल्या पिशव्यांकडे धाव घेतली. सुमितच्या हातात एक मोठी प्लॅस्टिकची पिशवी होती, ती त्यांनी हिसकावली. तो प्रकार पाहून सगळ्यांचीच टरकली. सगळ्यांनी आलो त्या वाटेने उलट्या दिशेने धूम ठोकली आणि त्या मोकळ्या ठिकाणी आलो, जिथून जंगल सुरु होतं.
         आता मात्र स्वप्न्या आणि साग्या दोघांनी पुढे येण्यास पूर्णपणे नकार दिला. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा निर्णय झाला होता. अखेर त्या दोघांशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
(भडंग, बिस्कीट, शेंगदाणे इत्यादींचा फडशा पाडणारी टोळी )
साग्या-स्वप्न्या भीमाशंकरकडे आणि आम्ही पुन्हा जंगलाकडे निघालो. ज्या ठिकाणी माकडांनी हल्ला चढवला होता त्या ठिकाणी आलो. पाहतो तर काय, माकडं भडंग, शेंगदाणे आणि बिस्किटं फस्त करत होती.ती मोठी पिशवी उचलली, त्यातील कपडे आहेत ना ह्याची खात्री करून पुढे निघालो. चालत-चालत आम्ही एका मठापाशी येऊन पोचलो. तिथून आता डोंगर चढायचा होता. मठापासून १५-२०मिनिटांत आम्ही नागफणीच्या शिखरावर पोचलोपण.
           वरती अप्रतिम वातावरण होतं, चोहोबाजूंकडे फक्त पाहतच राहावं इतकं सुंदर दृश्य होतं. ज्या बाजूनं वर  चढलो तिकडे झाडी आणि समोरच्या बाजूला थेट खाली - सरळ नेणारा डोंगरकडा/दरी...आणि तेव्हा कळलं ...काल जिथून आम्ही आलो होतो, तोच तर भाग होता तो...म्हणजे खांडस गाव समोर दिसत होतं, डावीकडे 'कलावंतीण महाल' दिसत होता...आणि काल जो जो कडा खालून पाहत होतो तो हाच .. नागफणीचा...मनसोक्त फोटो काढले...अगदी भरपूर...
(नागफणीवरून दिसणारं खांडस गाव )
(नागफणीचा कडा)
(नागफणीचा कडा आणि उजवीकडे कोपऱ्यात कलावंतीण महाल )
          एव्हाना स्वप्न्या-साग्याशी काही संपर्क होऊ शकला नव्हता, येष्टीस्टँडपाशी पोचले असावेत असं समजून आम्ही निघालो. अर्ध्या-पाऊण तासात आम्हीही तिथे पोचलो. बरीच पायपीट झाल्यामुळे आता अजून कुठे जायची कुणाची स्थिती वाटत नव्हती, भीमेचं उगमस्थान तेवढं जवळंच असल्यामुळं ते तेवढं पाहायला निघालो...
(भीमेचं उगमस्थान)
            भीमाशंकर देऊळाकडे जाण्यासाठी जे  प्रवेशद्वार आहे तिथून एक कच्ची पायवाट जाते, जी अगदी त्या उगमस्थानापाशी आणून सोडते. भीमेचं उगमस्थान म्हणजे काय ...तर एक छोटंसं मंदिर आणि समोरच एक छोटं कुंड, जिथून प्रवाह पुढे जातो..
              परतीचा प्रवास आता सुरु झाला होता. नाही म्हणायला एक हुरहूर राहिली होती...महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेली, शेकरू खार(Indian Giant Squirrel, जी भीमाशंकरमध्ये पाहायला मिळते) काही दिसली नाही कुठं ह्या ट्रीपलाही... येष्टीस्टॅण्डवर आलो. मुंबई (कि कल्याण)ची गाडी लागलीच होती. प्रण्याने धावत जाऊन पकडली. ती येष्टी पुण्यावरून जाणारी नव्हती(बहुतेक). पण राजगुरूनगरपर्यंत जाऊन तिथून मग अगदी पीएमटीपण मिळतात. मग आम्हीपण त्याच येष्टीत चढलो. ठरल्याप्रमाणे राजगुरूनगरला प्रण्याला 'टाटा बाय बाय' करून उतरलो. सगळे अगदीच थकले होते, So, चहा-कॉफी घेऊन मरगळ झटकून पुण्याची गाडी पकडली..
               आज जवळपास २ वर्ष झाली, ह्या वर्षासहलीला...पण खांडसगावापासूनचा भीमाशंकरपर्यंतचा प्रवास.. रात्रीचा मला भरलेला ताप...रात्री २-२.३० पर्यंत रंगलेले बदाम ७, दमशेराजचे डाव...नागफणी पॉईंटचं विहंगम दृश्य...सगळं डोळ्यांसमोर क्षणात उभं राहतं...