Wednesday, October 30, 2013

किल्ले राजगड मुक्कामी ट्रेक- एक भन्नाट अनुभव - २


            पहिल्या पार्टसाठी  

      पहाटे परत आजूबाजूच्या कलकलाटाने ५.३०-५.४५ ला जाग आली,सहाजणांपैकी पाचजणच होतो. बालटे गायब होता. तो 'फिरायला' गेला होता सकाळ-सकाळी ;)… हळूहळू सर्वजण उठलो आणि मंदिराबाहेर आलो. बाहेर काही तितकंसं उजाडलं नव्हतं. पण ब-याच दिवसांनी भल्या पहाटे (?) उठल्याचा अभिमान सगळ्यांना वाटत होता. पण जे वातावरण तयार झालं होतं ते फक्त आणि फक्त अवर्णनीयच होतं…मस्त धुकं पडलं होतं…उगवतीला फिकट तांबूस रंगाच्या छटा तयार झाल्या होत्या…खाली दिसणा-या गावातील रात्रीचे लुकलुकणारे दिवे अजून पूर्णपणे मालवले नव्हते …एकंदरीत एक रोमांटिक वातावरण तयार झालं होतं.


                इकडे-तिकडे फिरत…फोटो काढत वेळ जात होता…आणि जशी त्याची जाणीव झाली तसा मी सर्वांच्या भावनांना आवर घालायला लावून आवरायला सांगितलं. सर्वांनी आपापले प्रात:विधी उरकून होईपर्यंत ६.३०-६.४५ झालेपण.अर्थात अंघोळीचा काही प्रश्नच नव्हता…रात्री ज्या काका-काकूंकडून पिठलं-भाकरी खाल्लं होतं ते सकाळीही पोहे आणि चहानिशी तयार होते. सर्वांनी ब-यापैकी नाष्टा केल्यावर आम्ही पद्मावतीच्या पाया पडून मुक्कामाची ती जागा सोडली…सूर्योदय झाला होता…त्या उगवत्या सुर्यनारायणाला नमन करून पुढचा प्रवास सुरु केला तो सुवेळा माचीच्या दिशेने…गडावरच्या पायवाटा धुंडाळत वेगवेगळी रानफुले पाहत आम्ही सुवेळा माचीच्या दिशेने चालत होतो…जवळपास २-३ किमीचा प्रवास झाल्यावर आम्ही सुवेळा माचीला पोहोचणार होतो. जात असताना अधून-मधून थांबत पुन्हापुन्हा मागे वळून पद्मावती माचीकडे पाहू वाटत होतं ,वाटेत दिसणारे अक्राळ-विक्राळ खडक…डोंगर पाहत होतो…ज्या नेढ्याबद्दल मी एवढा Excite होतो तेही ह्याच वाटेवर होतं पण मला काही कुठे अजून दिसलंच नव्हतं. अधूनमधून थांबत मंडळींचे फोटो काढत होतो..एखादा माझाही येत होता… अखेर सुवेळा माचीच्या शेवटच्या टोकाला पोहोचलो. तिथून जे दृश्य दिसत होतं ते इतकं सुंदर होतं कि बस्स…अप्रतिम !!! काहीशा कमी उंचीच्या पण दूर पसरत गेलेल्या डोंगररांगा …. आणि समोर भाटघर धरणाचा जलाशय…सूर्यदेवही त्याच बाजूला वर येत होते…जवळपास ८-८.१५ झाले असतील …त्यामुळं कोवळी सूर्यकिरणे आणि अंगावर येणारा वारा झेलत त्या ठिकाणी बराच वेळ कुणाशी काही न बोलता मी फक्त उभा राहिलो. तो निसर्ग डोळेभरून पाहू कि कॅमे-यात साठवू असं झालं होतं अक्षरश: मला…. फक्त पाहतंच राहावं …उजव्या बाजूला एक किल्ला दिसत होता.. रोहीडाच असावा बहुधा…
            माघारी येताना सुम्याला वाटेत नेढ दिसलं…आम्ही जाताना तिथूनच गेलो होतो पण किंचित उंचीवर असल्यामुळे ते कळलं नव्हतं… सगळेजण नेढ्यात जाउन बसलो … हे नेढ म्हणजे…अं..समजा डोंगराची कडा जर भिंत धरली तर हे नेढ म्हणजे त्या भिंतीला असणारी खिडकी… :) तिथली १५-२० मिनिटं म्हणजे मस्त होती…एकएक नवीन अनूभव आम्ही घेत होतो.पटापट फोटो काढून घेतले आणि माघारी निघालो…सुम्या,सुशा आणि मी सोडून इतर तिघे आधी राजगड आले नव्हते त्यात विज्याने बालेकिल्ला पहायचा आग्रह धरला …बाकीच्यांनीही हो मध्ये हो मिसळल्यामुळे मग वर बालेकिल्ल्यावर जायचं ठरलं. सुशा तेवढा नको म्हणाला, मग त्याला तिथंच bag सांभाळायला बसवून आम्ही बालेकिल्ल्यावर निघालो. त्यापूर्वी पद्मावतीवरच्या गोड,स्वच्छ आणि थंड पाण्याच्या टाकीतून सर्व बाटल्या भरून घेतल्या. ती टाकी नसती तर खरोखरंच गडावर येणा-यांचे हाल झाले असते…कारण जरी  गडावर बरीच तळी-टाक्या असल्या तरी त्यातल्या त्यात फक्त हीच टाकी गडावर येणा-यांची तहान भागवते … 
               बालेकिल्ला फिरून परतेपर्यंत १०.३०-१०.४५ झाले… प्लानची अक्षरश: वाट लागली होती.माझ्या मूळ प्लाननुसार ९ला संजीवनी माचीच्या दिशेने निघायला पाहिजे होतो,पण निघेपर्यंत ११ झाले…आता लक्ष्य होतं लवकरात लवकर संजीवनी माची गाठायची,आणि अळू दरवाजा शोधायचा…जाताना वाटेत पिवळ्या फुलांचे  गालिचे पसरलेले दिसत होते…मोठमोठाले  बुरुज पार करत आम्ही संजीवनी माचीकडे चालत होतो…भरपूर पायपिटी नंतर जेव्हा संजीवनी माचीचा शेवटचा बुरुज आला आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला…पण शेवटच्या टोकापर्यंत कळलं इथं तर उतरायला मार्गच नाही आणि जो अळू दरवाजा आम्ही शोधत होतो तो ब-याच शोधाशोधीनंतरही सापडत नव्हता.जवळपास अर्ध्या-पाउण तासानंतर अखेर अळू दरवाजा सापडला.छोटासाच दरवाजा होता. तिथून बाहेर पडल्यावर एक अरुंद वाट त्या माचीला वळसा घालून उतरत होती आणि तोच होता राजगड-तोरणा ट्रेकचा मार्ग. आम्ही हळूहळू राजगड उतरायला सुरुवात केली…वाट तशी फार अवघड नव्हती पण सोपीही नव्हती. उतरताना उजव्या बाजूला गर्द झाडी तर डाव्या बाजूला खोल दरी होती.एकएक टेकडी चढत-उतरत…कधी गर्द झाडीतून कधी उघड्या माळावरून आमचा प्रवास चालू होता.एके ठिकाणी तर बालटे बंधूंना हिरव्या सर्पाच दर्शन झालं.मी सर्वात मागे असल्यामुळं मला काही क्लिक करायला मिळाला नाही. पण त्या दर्शनानं आमची जर का होईना टरकली…


 

                     उन्हामुळे घशाला सारखी कोरड पडत होती आणि पाण्याच्या बाटल्या रिकाम्या होत होत्या. एका उंच टेकडीवर थोडा आराम करायचा ठरवला.पिशव्यांमधून ब्रेड,जाम,थेपले काढले आणि एक एक करून फडशा पडायला सुरुवात केली…आणि मानस्याने म्हटल्याप्रमाणेच झालं ..मी ब्रेड घ्यायला नको होतं ,त्या ब्रेडमुळे सर्वाना तहान लागली आणि पाणी तर थोडाच उरलं होतं,त्यात वाटेत अगदी पाण्याचा थेंबही दिसला नाही…ना झरा ना टाकी…महाराजांनी मुद्दामच बहुतेक काही बांधलं नसावं शत्रूची परीक्षा घेण्याकरता जेणेकरून गनीम आलाच नाही पाहिजे त्या वाटेने …थोड्या वेळाने आम्ही पुन्हा आमचा प्रवास सुरु केला. सगळेच जण दमल्यासारखे वाटत होतो आणि ट्रेकच्या मध्याची खुण …ते टेकडीवरचं घर काही अजून आम्हाला दिसलं नव्हतं म्हणजे आमचा निम्मा प्रवासही झाला नव्हता कि काय ?? जर वेळानं एका डांबरी रस्त्यावर आम्ही उतरलो. तिथून पुढे २ वाटा आत पुढे जात होत्या. एके ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा फलक होता जो तोरण्याकडे जाणारी वाट दाखवत होता आणि दुसरीही अशीच एक पायवाट होती,तयार झालेली. तिथं विज्या म्हणायला लागला, शासनाच्या फलकाच्या बाजूनं जाऊयात आणि मी म्हणत होतो दुस-या वाटेनं जाउयात कारण पहिल्या वाटेनं पुढं काही वाट नीट दिसत नव्हती.पण शेवटी निर्णय असा झाला कि,अमोल बालटे आणि मी 'त्या' पहिल्या वाटेनं पुढं जाऊन बघणार कि खरच वाट आहे का नाहीतर मग दुस-या वाटेनं जायचं..आमल्या आणि मी त्या वाटेनं झाडीत घुसलो. बराच आतपर्यंत गेलो पण वाट अशी कुठे दिसली नाही. अखेर अशा ठिकाणी येउन पोहोचलो कि तिथून पुढं फक्त दरी होती…माघारी परतलो…पाहतो तर काय आमचे उसेन बोल्ट-बालटे, सुशा तिथं रस्त्यावरच अंग टाकून पडले होते.आता मात्र सर्वांची पावर डाऊन झाली होती. दुपारचे दोन-अडीच झाले असतील…मलाही तसा थकवा जाणवत होता पण तरीही मी सर्वाना पुढे निघायला तयार करत होतो पण कुणीही त्या मूडमध्ये नव्हतं…
              हो-नाही हो-नाही करत अखेर मीही थोडा प्राक्टीकली विचार केला आणि मीही तिथंच या रस्त्यावर आडवा झालो आणि तोरणा रद्द झाला. वाईट तर वाटत होतं पण खरोखर पुढं  ट्रेकिंग करणं अशक्य वाटत होत. कारण पुढचा टप्पा तसा थोडासा अवघड होता आणि तोरण्यावर पोहोचल्यावर पण किल्ला फिरता येणार नव्हता कारण परत किल्ला उतरून वेल्हा गाव गाठायचं आणि परतीचा प्रवास करायचा होता…सगळा विचार सोडून दिला आणि तसाच पडून राहिलो…
              तसं पाहायला गेलं तर फक्त २:४५-३:०० वाजले होते,इतक्या लवकर परतून काही तसा फायदा नव्हता मग बनेश्वर पण नसरापूर जवळच असल्याचं मी सांगितलं आणि मग तिकडं जायचं ठरवलं. आम्ही अशा ठिकाणी होतो कि तिकडून आम्हाला कुठलंही वाहन मिळणं तसं अवघडच होतं आणि सगळ्यात जवळचं गाव म्हणजे वाजेघर जवळपास ४-५ किमी तरी असेल, पण तिथं पोहोचण्याशिवाय पर्याय नव्हता आणि अखेर आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.खरंतर नंतर मला नंतर असं कळलं कि, राजगड -तोरणा असा ट्रेक करणारे सहसा लवकर सकाळी ७ लाच राजगडवरून तोरण्याकडे निघतात आणि आमचं नेमकं तिथंच चुकलं होतं. आराम केल्यामुळे थोडे का होईना आम्ही फ्रेश झालो होतो.थोडं अंतर कापल्यावर एक झरा दिसला आणि तिथंच एक ताई पण आमच्या समोरून येताना दिसल्या.त्यांना वाजेघर बद्दल आणि त्या मध्यावरच्या घराबद्दल चौकशी केली असता कळलं कि अंतर आम्ह्क बरंच राहिल होतं आणि वाटंही तशी बिकट होती. त्या झ-याचं पाणी पिण्यायोग्य आहे का ह्याची खात्रीही करून घेतली जेणेकरून पुढच्या आमच्या टप्प्यात पाण्याच्या बाटल्या भरून घेता याव्यात. आम्ही अशा रस्त्यानं चाललो होतो जिथून राजगड आणि तोरणा दोन्ही गड समान अंतरावर दिसत होते आणि अगदी फोटोजेनिक …मी  पटापट फोटो काढून घेतले.
             ब-याच पायपिटीनंतर एक वाडी लागली, तिथं एक क्वालीस दिसली आणि कळलं कि ती गाडी नसरापुरलाच जाणार होती.…बरीच घासाघीस करावी लागली चांगलं आठवतंय…अं बहुतेक ४० ला फायनल ठरलं.त्यांनी आम्हाला बनेश्वरच्या गेटपाशी आणून सोडलं.
             मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर मंदिर तितकंसं जुनं वाटत नव्हतं, बहुधा नुकतीच रंगरंगोटी झाल्यामुळे वाटलं असेल…मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिराची माहिती वजा इतिहास वाचायला मिळाला…नानासाहेब पेशव्यांनी हे मंदिर बांधलं वगैरे वगैरे…मंदिर सुंदर होतं. मंदिराच्या समोर दोन छोटी तळी होती,त्यात लहान-लहान मासे व काही कासव होती. ती पाहण्यासाठी लहान मुलांनी अगदी गर्दी केली होती अगदी तरुण मुले-मुलीही त्याला अपवाद नव्हते.मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन सर्वजण बाहेर कट्ट्यावर येउन बसलो आणि ५-१० मिनिटात धबधब्याकडे निघालो. मंदिराच्या मागच्या परिसरात हा धबधबा होता. थोड्याच वेळात आम्ही इथे पोहोचलो.हा धबधबा म्हणजे मंदिराच्या मागून जी शिवगंगा नदी वाहते तिच्या पात्रात मोठ-मोठया खडकांमुळे पात्राला धबधब्याचं रूप आलं होतं.…त्या धबधब्याच्या पाण्याचा आवाज ऐकत थोडा वेळ तसाच बसून राहिलो…तो धबधबा…तो मावळतीचा सूर्य एक मस्त वातावरण निर्मिती करत होते…


             नसरापूर फाट्याला पोहोचेपर्यंत ६-६:३० झाले.तिथे मस्त वडापाव आणि चहा हाणला आणि थांब्याला जाऊन येष्टीची वाट बघत उभा राहिलो. येष्टीच्या 'वाट मी पाहीन पण येष्टीनेच जाईन' लाइन पाळायचा प्रयत्न केला पण येष्टी काही मिळेना मग शेवटी एका जीपड्याला हात केला आणि त्या जीपने कात्रजपर्यंत आणून सोडलं तिथून आम्ही आपापल्या रुमांकडे मार्गस्थ झालो. ह्या ट्रीपमध्ये काही प्रयत्न फसले होते…काही गोष्टी साध्य करता आल्या नव्हत्या…पण हि ट्रीप हा ट्रेक एक आयुष्यभराकरताचा अविस्मरणीय…रोमांचकारी अनुभव देऊन गेला …आणि ते नक्कीच काही कमी नव्हतं…