Thursday, December 01, 2022

श्री काळे यांचे, श्री दुर्गादेवी मंदिर, बारामती

                 आमच्या बारामतीची 'माळावरची देवी' म्हणजेच 'तुळजाभवानीचं मंदिर', पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध. दर मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला दूरवरून भाविक दर्शनाला येत असतात. नवरात्रोत्सव म्हणजे तर पर्वणीच असते, नऊ-दहा दिवस. तुळजापूरच्या देवीप्रमाणेच रोज निरनिराळ्या रूपात इथेही आईची पूजा केली जाते. वेगवेगळे कार्यक्रम मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात. मंदिराचा आजूबाजूचा परिसर खाऊचे कित्येक पदार्थ, खेळणी,  दागदागिने इत्यादींच्या दुकानांनी अगदी फुलून जातो. ह्या मंदिराखेरीज, भिगवण चौकातील 'श्री सिद्धीविनायकं' मंदिराशेजारचं 'दुर्गामातेचं' मंदिर बऱ्यापैकी श्रद्धाळूंना-भाविकांना माहित असावं... पण आज मी बारामतीमधल्याच एका सुंदर, अनभिज्ञ राहिलेल्या मंदिराबद्दल सांगणार आहे....

               झालं असं, नवरात्रीच चालू होत्या. आई तिच्या मैत्रिणींच्या गृपसोबत रोज 'माळावरच्या देवीला' तर जात होतीच, शिवाय 'पिंपळ्याच्या पद्मावतीला' (भिगवणच्या अलीकडे ३ किमी) एक दिवस, 'शिर्सुफळच्या शिरसाईला'(बारामती-पुणे रेल्वे मार्गावर स्टेशन आहे) एक दिवस जाऊन आली. पप्पांनी एके दिवशी २ सुंदर फोटो पाठवले. एक देवीच्या मूर्तीचा, एक मंदिराचा...कधीच न पाहिलेले होते दोन्ही फोटो. आणि मग पप्पांनी सांगितल्यावर कुठं मला ह्या मंदिराबद्दल माहित झालं, 'काळे ह्यांच्या दुर्गादेवी' मंदिराबद्दल, ठिकाण- सिद्धेश्वर गल्ली, श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर.                

            लहानपणापासून कित्येक वेळा सिद्धेश्वर देवळात गेलो असेल, पण कोण जाणे कधीच लक्ष गेलं नाही, इतक्या समोर मंदिर दिसत असताना...आता मात्र चंग बांधला होता, जायचंच. दिवाळीचा पहिला दिवस, नरक चतुर्दशी होती. शुभांगी आणि मी, दोघे आधी मेडदला- श्री भीमाशंकर दर्शन घेऊन आलो(त्याबद्दल पण लिहिणार आहे).  रस्त्यावरून पाहिलं तर,  फक्त मंदिराचं दगडी शिखर दिसतं पण प्रवेशद्वार दिसत नाही. बारामती नगरपरिषदेच्या ६ नंबर शाळॆसमोर, साध्या फाटकातून आत गेल्यावर १०-१५ पावलांवर लाकूड- मातीच्या भिंतीचं प्रवेशद्वार दिसतं. त्यावर फलक दिसतो, 'श्री काळे यांचे, श्री दुर्गादेवी मंदिर'.. 

                आत प्रवेश केल्या-केल्या वाड्यासदृश बांधकाम दिसतं. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंना छोटी मंदिरे दिसतात. मंदिराची रचना पाहिल्यावर मला सासवडमधल्या 'कऱ्हामाई' मंदिराची आठवण झाली. सभोवताली मातीच्या भिंती, मध्यभागी लाकडी खांब, त्यावर लाकडी तुळया-बांधकाम आणि लोखंडी पत्र्याचं कौलारू छप्पर. ५-१० पावलंच आत आलो, आणि अगदी नीरव शांतता जाणवते आणि तिथलं वातावरण मन प्रसन्न करून टाकतं. हि बांधकामशैली पेशवेकालीन वाटते. शनिवारवाडा, थेऊरचं चिंतामणी मंदिर असंच बांधकाम जाणवतं. इंटरनेटवर फारशी माहिती उपलब्ध नाही.  हे मंदिर 'श्री. गोविंद नामदेव काळे' ह्यांनी बांधल्याचा उल्लेख आढळतो.(चुकीची असल्यास किंवा अधिक माहिती असल्यास जरूर कमेंटमध्ये कळवा) त्यांना सरदार काळे असंही म्हणतात, त्यांचा मारवाड पेठेतील वाडा येता-जाता पाहिला आहे. श्री. गोविंद काळे, पेशव्याचें वकील असल्याचाही उल्लेख आहे. 

               

         मंदिरात प्रवेश केल्यापासून, मुख्य गाभाऱ्याकडे जाताना ४-५ खांब आहेत. फरशीच्या मधोमध चौकोनी आकारामध्ये काहीतरी खड्डा/ खाच करून लाकडाने झाकून ठेवेलेलं दिसतं. समोर पायऱ्यांपाशी गेल्यावर इतर मंदिरांप्रमाणे दुर्गामातेचं थेट दर्शन झालं नाही आणि प्रवेशही तिथून नाही. खाजगी देवस्थान असल्यामुळे ठराविक वेळेत गाभाऱ्याचा दरवाजा उघडत असावा, तो जाळीचा असल्यामुळे काही दिसत नाही.मग आम्ही उजव्या बाजूने काही पायऱ्या दिसतात, तिथून दर्शनासाठी वरती गेलो. दरवाज्याच्या जाळीतून सुंदर दर्शन होतं...एका देवघरासारख्या आकाराच्या छोट्या मंदिरात देवीची अंदाजे २-२.५ फूट उंचीची, संगमरवरात बनलेली सुबक मूर्ती चित्त वेधून घेते. आपोपाप हात जोडले जातात. मनातले सगळे विचार मागे पडून, आपण तिथे रमून जातो.  गाभाऱ्यात फारशा  काही वेगळं बांधकाम -वस्तू नाहीत. एक छोटं टेबल, त्यावर पूजेचं साहित्य, बाजूला कमानी आहेत, त्यात छोट्या देवळ्या दिसतात.

                 डाव्या बाजूने पायऱ्या उतरून, प्रदक्षिणेसाठी वळल्यावर, पहिलं मंदिर आहे  'श्री विष्णुनारायण', इथल्या सगळ्याच मूर्ती संगमरवरात घडवलेल्या आहेत. पुढे प्रदक्षिणा मार्गात लागतं, 'श्री महादेव' मंदिर. इथे आपल्याला काहीसा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण बहुतांशी 'शंभू महादेव मंदिर' म्हणजे पिंड, समोर नंदी. पण इथे पिंड तर आहेच, सोबत शिवशंकर आणि कुटुंब, म्हणजेच शंकर, पार्वती आणि बालगणेश... रेखीव गोंडस अश्या मूर्ती आहेत. पुढे तिसरं मंदिर आहे, 'श्री गणेशाचं', हि मात्र  मूर्ती शेंदुराने सजलेली आहे. प्रदक्षिणामार्गातलं अखेरचं मंदिर, 'श्री सूर्यनारायण'. ७ अश्व असलेल्या, 'अरुण' सारथ्य करणाऱ्या रथामध्ये 'श्री सूर्यनारायण' विराजमान आहेत. 



       

प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर आणखी काही वेळ मंदिरात शांत बसून राहिलो. आजूबाजूला लहान ते मध्यम आकाराची झाडे, त्यावर बागडणारी फुलपाखरे न्याहाळत बसलो. बऱ्यापैकी स्वच्छता दिसते. मनसोक्त फोटो काढून घेतले आणि ह्या अनभिज्ञ अशा मंदिराची जमेल तशी ओळख करवून द्यायचा विचार पक्का करून, देवीला मनापासून वंदन करून, बाहेर पडलो. 

  

 

 

 

 

 

 

माळावरची देवी