Thursday, December 01, 2022

श्री काळे यांचे, श्री दुर्गादेवी मंदिर, बारामती

                 आमच्या बारामतीची 'माळावरची देवी' म्हणजेच 'तुळजाभवानीचं मंदिर', पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध. दर मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला दूरवरून भाविक दर्शनाला येत असतात. नवरात्रोत्सव म्हणजे तर पर्वणीच असते, नऊ-दहा दिवस. तुळजापूरच्या देवीप्रमाणेच रोज निरनिराळ्या रूपात इथेही आईची पूजा केली जाते. वेगवेगळे कार्यक्रम मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात. मंदिराचा आजूबाजूचा परिसर खाऊचे कित्येक पदार्थ, खेळणी,  दागदागिने इत्यादींच्या दुकानांनी अगदी फुलून जातो. ह्या मंदिराखेरीज, भिगवण चौकातील 'श्री सिद्धीविनायकं' मंदिराशेजारचं 'दुर्गामातेचं' मंदिर बऱ्यापैकी श्रद्धाळूंना-भाविकांना माहित असावं... पण आज मी बारामतीमधल्याच एका सुंदर, अनभिज्ञ राहिलेल्या मंदिराबद्दल सांगणार आहे....

               झालं असं, नवरात्रीच चालू होत्या. आई तिच्या मैत्रिणींच्या गृपसोबत रोज 'माळावरच्या देवीला' तर जात होतीच, शिवाय 'पिंपळ्याच्या पद्मावतीला' (भिगवणच्या अलीकडे ३ किमी) एक दिवस, 'शिर्सुफळच्या शिरसाईला'(बारामती-पुणे रेल्वे मार्गावर स्टेशन आहे) एक दिवस जाऊन आली. पप्पांनी एके दिवशी २ सुंदर फोटो पाठवले. एक देवीच्या मूर्तीचा, एक मंदिराचा...कधीच न पाहिलेले होते दोन्ही फोटो. आणि मग पप्पांनी सांगितल्यावर कुठं मला ह्या मंदिराबद्दल माहित झालं, 'काळे ह्यांच्या दुर्गादेवी' मंदिराबद्दल, ठिकाण- सिद्धेश्वर गल्ली, श्री सिद्धेश्वर मंदिरासमोर.                

            लहानपणापासून कित्येक वेळा सिद्धेश्वर देवळात गेलो असेल, पण कोण जाणे कधीच लक्ष गेलं नाही, इतक्या समोर मंदिर दिसत असताना...आता मात्र चंग बांधला होता, जायचंच. दिवाळीचा पहिला दिवस, नरक चतुर्दशी होती. शुभांगी आणि मी, दोघे आधी मेडदला- श्री भीमाशंकर दर्शन घेऊन आलो(त्याबद्दल पण लिहिणार आहे).  रस्त्यावरून पाहिलं तर,  फक्त मंदिराचं दगडी शिखर दिसतं पण प्रवेशद्वार दिसत नाही. बारामती नगरपरिषदेच्या ६ नंबर शाळॆसमोर, साध्या फाटकातून आत गेल्यावर १०-१५ पावलांवर लाकूड- मातीच्या भिंतीचं प्रवेशद्वार दिसतं. त्यावर फलक दिसतो, 'श्री काळे यांचे, श्री दुर्गादेवी मंदिर'.. 

                आत प्रवेश केल्या-केल्या वाड्यासदृश बांधकाम दिसतं. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंना छोटी मंदिरे दिसतात. मंदिराची रचना पाहिल्यावर मला सासवडमधल्या 'कऱ्हामाई' मंदिराची आठवण झाली. सभोवताली मातीच्या भिंती, मध्यभागी लाकडी खांब, त्यावर लाकडी तुळया-बांधकाम आणि लोखंडी पत्र्याचं कौलारू छप्पर. ५-१० पावलंच आत आलो, आणि अगदी नीरव शांतता जाणवते आणि तिथलं वातावरण मन प्रसन्न करून टाकतं. हि बांधकामशैली पेशवेकालीन वाटते. शनिवारवाडा, थेऊरचं चिंतामणी मंदिर असंच बांधकाम जाणवतं. इंटरनेटवर फारशी माहिती उपलब्ध नाही.  हे मंदिर 'श्री. गोविंद नामदेव काळे' ह्यांनी बांधल्याचा उल्लेख आढळतो.(चुकीची असल्यास किंवा अधिक माहिती असल्यास जरूर कमेंटमध्ये कळवा) त्यांना सरदार काळे असंही म्हणतात, त्यांचा मारवाड पेठेतील वाडा येता-जाता पाहिला आहे. श्री. गोविंद काळे, पेशव्याचें वकील असल्याचाही उल्लेख आहे. 

               

         मंदिरात प्रवेश केल्यापासून, मुख्य गाभाऱ्याकडे जाताना ४-५ खांब आहेत. फरशीच्या मधोमध चौकोनी आकारामध्ये काहीतरी खड्डा/ खाच करून लाकडाने झाकून ठेवेलेलं दिसतं. समोर पायऱ्यांपाशी गेल्यावर इतर मंदिरांप्रमाणे दुर्गामातेचं थेट दर्शन झालं नाही आणि प्रवेशही तिथून नाही. खाजगी देवस्थान असल्यामुळे ठराविक वेळेत गाभाऱ्याचा दरवाजा उघडत असावा, तो जाळीचा असल्यामुळे काही दिसत नाही.मग आम्ही उजव्या बाजूने काही पायऱ्या दिसतात, तिथून दर्शनासाठी वरती गेलो. दरवाज्याच्या जाळीतून सुंदर दर्शन होतं...एका देवघरासारख्या आकाराच्या छोट्या मंदिरात देवीची अंदाजे २-२.५ फूट उंचीची, संगमरवरात बनलेली सुबक मूर्ती चित्त वेधून घेते. आपोपाप हात जोडले जातात. मनातले सगळे विचार मागे पडून, आपण तिथे रमून जातो.  गाभाऱ्यात फारशा  काही वेगळं बांधकाम -वस्तू नाहीत. एक छोटं टेबल, त्यावर पूजेचं साहित्य, बाजूला कमानी आहेत, त्यात छोट्या देवळ्या दिसतात.

                 डाव्या बाजूने पायऱ्या उतरून, प्रदक्षिणेसाठी वळल्यावर, पहिलं मंदिर आहे  'श्री विष्णुनारायण', इथल्या सगळ्याच मूर्ती संगमरवरात घडवलेल्या आहेत. पुढे प्रदक्षिणा मार्गात लागतं, 'श्री महादेव' मंदिर. इथे आपल्याला काहीसा आश्चर्याचा धक्का बसतो, कारण बहुतांशी 'शंभू महादेव मंदिर' म्हणजे पिंड, समोर नंदी. पण इथे पिंड तर आहेच, सोबत शिवशंकर आणि कुटुंब, म्हणजेच शंकर, पार्वती आणि बालगणेश... रेखीव गोंडस अश्या मूर्ती आहेत. पुढे तिसरं मंदिर आहे, 'श्री गणेशाचं', हि मात्र  मूर्ती शेंदुराने सजलेली आहे. प्रदक्षिणामार्गातलं अखेरचं मंदिर, 'श्री सूर्यनारायण'. ७ अश्व असलेल्या, 'अरुण' सारथ्य करणाऱ्या रथामध्ये 'श्री सूर्यनारायण' विराजमान आहेत. 



       

प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर आणखी काही वेळ मंदिरात शांत बसून राहिलो. आजूबाजूला लहान ते मध्यम आकाराची झाडे, त्यावर बागडणारी फुलपाखरे न्याहाळत बसलो. बऱ्यापैकी स्वच्छता दिसते. मनसोक्त फोटो काढून घेतले आणि ह्या अनभिज्ञ अशा मंदिराची जमेल तशी ओळख करवून द्यायचा विचार पक्का करून, देवीला मनापासून वंदन करून, बाहेर पडलो. 

  

 

 

 

 

 

 

माळावरची देवी

 











Saturday, August 13, 2022

ट्रेक वासोटा ऊर्फ व्याघ्रगड


           ऑफिसमध्ये लंच टेबलवर सागर, अस्मिता , कुंदन सोबतच त्या दिवशी नवीन मेम्बर होती, दीपा ... अस्मिताच्या टिममधली बीए (Business Analyst). असंच जेवत असताना नेहमीच्या गप्पा-टप्पा सुरु होत्या, तेव्हा दीपाने weekendचा विषय काढला. बाकी कुणाकडे काही खास सांगण्यासारखं नव्हतं. तिने मग तिचं सांगितलं , ती एक ग्रुपसोबत देवकुंड धबधब्याची सहल करून आली होती. पुणे ते पुणे सर्व नियोजन त्या गृपनेच केलं होतं... तिने आणखी थोडी माहिती दिली, आणखी कोणकोणत्या सहलींचे प्लॅन करतात वगैरे, उदा. मालवण-तारकर्ली , हरिश्चन्द्रगड, वासोटा. मालवण वगैरे ठीक आहे, पण दुसरी २ नावे ऐकताच माझे कान टवकारले ...हरिश्चन्द्रगड आणि वासोटा ट्रेक करायची बऱ्याच दिवसांची इच्छा राहिली होती...  

          दीपाने सांगितल्याप्रमाणे मी इंस्टाग्राम ला जाऊन ग्रुपची माहिती काढली, संपर्क साधला. हरिश्चन्द्रगड ट्रेक नळीच्या वाटेने आहे कळल्यावर तो प्लॅन रद्दच केला (ती ३ वाटांमधली सगळ्यात अवघड वाट मानली जाते) आणि वासोट्याची माहिती काढली.प्लॅन इंटरेस्टिंग वाटला. सुम्या+सायली नवविवाहित दाम्पत्य असल्या कारणाने जास्त काही विचारणं योग्य वाटलं नाही, सुहया फिलिपिन्सला होता, योग्याला बहुतेक विचारलं नव्हतंच..घरात लहान बाळ असल्यामुळे...अजून कुणाला विचारायच्या फंदात न पडता..ऑर्गनायझरना संपर्क साधून, त्यांनी सांगितल्याप्रमाणे (दोघांचे.... बायको आणि मी ) निम्मे पैसे जमा केले आणि उरलेले प्रवास सुरु होताना द्यायचं ठरलं. 

        काय घ्यायचं , काय नाही ह्याची यादी त्यांनी तर दिलीच होती, पण ट्रेकिंगचा तसा अनुभव असल्याने आवश्यक वस्तू काढून ठेवल्या होत्या. मुख्य म्हणजे डिसेंबर असल्याने आणि मुक्काम करायचा असल्याने उबदार कपडे , ब्लॅंकेट गरजेचं होतंच. सुका खाऊ, पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतल्या. 

(शास्त्रानुसार निघताना काढलेला सेल्फी)

 २२ डिसेंबर, रात्री ८.३० ला शिवाजीनगर वरून पिकअप होता. मी आणि बायको ८-८.१५ च्या आसपास बँक ऑफ महाराष्ट्र्च्या गेटवर येऊन थांबलो. कॉल करून चौकशी केली असता, on the way आहोत.. लवकरच पोहचतोय असं उत्तर आलं. शिवाजीनगरचा पहिला पिकअप होता आणि दुसरा स्वारगेटला नटराज हॉटेलला. आम्ही उभे होतो तिथे असपास ७-८ जा बॅगा घेऊन उभे होते. ९च्या आसपास एक बस असली, तशी मोकळीच होती. एक जण Organizers मधला बसमध्ये चढला , मग पाठोपाठ जे आजूबाजूला उभे होते ते सुद्धा बसमध्ये चढून बसले. १० मिनिटे थांबून, त्या पिकअप पॉईंटचे सर्वजण आलेले चेक करून गाडी निघाली, पुढच्या पिकअपला नटराज हॉटेल, स्वारगेट. 

 रात्रीचे साडेनऊ झाले असतील, जेव्हा स्वारगेटला होतो, पण एक-एक जण येता येता साडे-दहा वाजून गेले. तिथूनच १२-१२.३० ला पोहचुन झोपायचा प्लॅन फिसकटणार वाटू लागलं. शिवापूर टोलनाका क्रॉस केल्यावर ऑर्गनायझर मधला सागर उठला आणि मरगळलेल्या सगळ्यांना जागं करायला म्हणून 'अंताक्षरी'चा खेळ सुरु केला. कुणी नवीन, कुणी जुनी गाणी म्हणत खेळ चांगलाच रंगला. रात्र जसजशी वाढू लागली, एक एक शान्त होऊ लागला. साताऱ्याच्या अलीकडे एका पेट्रोलपंपवर गाडी थांबली. सर्वजण फ्रेश होऊन बसले. मग जे गाडी सुटली आणि मलाही झोप लागली ते थेट गारवा जाणवू लागल्यावर जाग आली. घाट सुरु होता. कोयनेच्या 'शिवसागर'च्या आसपास होतो. २ वाजले मुक्कामाच्या ठिकाणी पोहचायला. कुठलीशी वाडी होती..नाव विसरलो आता.. 

('सौं.'चा फोटोचा हट्ट आणि काय)
         समोरच १०० मीटरवर पाणी दिसत होतं, लांब पसरलेलं.. ३ बाजूंनी डोंगर आणि झाडी. तिथंच ५-६ खोल्या, २-३ बाथरूम-टॉयलेट आणि आधीच सांगितल्याप्रमाणे तंबू लागून तयार होते. दरम्यान, ट्रेकसाठी आलेल्या सर्वांनी आपापले तंबू सामान टाकून नक्की केले. आम्हा  दोघांचा तंबू अगदीच मध्यावर होता, समोर एक मोठं झाड, त्यापलीकडे १५-२० पावलांवर पाणी. भलेही आवरा-आवरीमध्ये २.३० झाले, कुणी झोपायच्या मूडमध्ये दिसत नव्हतं. कुणाचं फोटो काढणं, कुणाचं कॅरम खेळणं चालू होतं. इतक्यात Organizersनी शेकोटी पेटवली, मग काय डिसेंबरच्या थंडीने कुडकुडणारी जनता शून्य मिनिटांत शेकोटीभोवती गोळा झाली. 
(रात्री शेकोटीभोवती जमलेलो)
 
  पण सकाळी लवकर उठायच्या इंस्टक्शन्स आल्याने, हळूहळू गर्दी पांगली .. सगळे झोपायला आपापल्या टेन्टकडे चालते झाले. आम्ही ३-३.१५ च्या आसपास निद्रेच्या अधीन झालो. 
(झुंजूमुंजू होताना)
          सकाळी ६.३० ला बाहेर हालचाल, कुजबुज ऐकू यायला लागली तशी आम्हाला जाग आली. टेन्टचा दरवाजा उघडला, तर आहाहा! काय सुरेख दृश्य नजरेस पडलं. टेंटच्या कमानीतून समोरचा डोंगर, त्यावरची गर्द झाडी, अलीकडे पाणी त्यावर पसरलेलं धुकं... आणि एक दोन बोटी बांधून ठेवलेल्या.. फक्त पाहतच रहावं असं ...पण आजूबाजूच्या गडबडीने पुन्हा भानावर आलो आणि प्रात:विधींसाठी मागील खोल्यांकडे निघालो.
(सकाळचा नाष्टा )
हात-पाय-तोंड धुवून आणि फक्त अंघोळीची गोळी खाऊन, वेळ निभावून नेण्याचा प्रस्ताव बायको आणि मी बहुमताने पास करून नाश्त्याच्या रांगेत जाऊन उभा राहिलो . नाष्ट्याला पोहे आणि चहा होता ... तसा चवीला so-so च म्हणू (अमृततुल्यची चटक लागलेल्याना वाटणारच असं म्हणू नका) पण त्या वातावरणात ते गरमागरम पोहे आणि वाफाळलेला चहा पिताना मजा आली....
(ओळख परेड)
        साधारणतः ८.३० च्या आसपास ऑर्गनायझर्स नी सर्वांना एकत्र बोलावून, राऊंड करून उभे केलं. त्यांचे मुख्य लोक्स विभा, सागर, विशाल इत्यादींनी आपापला intro करून दिला. इतरांनीही आपापली ओळख सांगितली, त्यावेळी ४-५ चेहरे रात्रीतून वेगळे दिसले. त्यांनी ओळख करून देताना बारामतीहून आल्याचं सांगितलं. ते ऐकताच अस्मादिकांच्या डोळ्यात चमक आणि चेहऱ्यावर हास्य उमललं. दरम्यान, सौ.च्या नजरा माझ्यावरच होत्या. हसत-हसत hmm hmm चालूच होतं. बरं ...तर ऑर्गनायझर्सनी संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. आणि दुपारच्या जेवणाची सोय म्हणून थेपल्यांची पाकिटे वाटली आणि एनर्जी ड्रिंक म्हणून Boat चे पाऊच वाटले. हे सर्व सुरु असतानाच २ बोटी बाजूला तयार होऊन उभ्या होत्याच. आणि थोड्याच वेळात वासोट्याच्या दिशेने बोटी मार्गस्थ झाल्या.

         हा बोटींचा प्रवास सुरु झाला खरा ... पण थोड्याच अंतरावर जाऊन आमची बोट भर पाण्यात जाऊन मध्येच थांबली ... नक्की काय झालं ठाऊक नाही आजपण .. पण बहुतेक दुसरी बोट भलतीकड़ेच गेली होती... थोड्या वेळाने दोन्ही बोटी एकत्र आल्या आणि प्रवास पुनःश्च सुरु झाला. उजवीकडे दूर बामणोलीच्या खुणा वाटत होत्या... तिथलं जवळचंच श्री. दत्तात्रेयांचं मंदिर असलेलं बेट दिसत होतं.. २०११च्या सहलीच्या आठवणी काही क्षण जाग्या झाल्या...पाण्यात अथवा छोट्या बेटांवर जी झाडे दिसत होती , ती जरा विचित्र वाटत होती. जवळपास अर्धी झाडे पिवळी होती आणि वरचा भाग हिरवागार. बहुतेक पावसाळ्यात जेव्हा धरणाचं पाणी वाढतं आणि इथली पाणी पातळी वाढते तेव्हा ही झाडे पाण्यात राहत असणार .. २-३ महिने किमान, त्यामुळे ती अशी दिसत असावीत. 

(इथून खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरुवात होते)
         एका मागोमाग एक टेकड्या पार करत, मजल-दरमजल करत अखेर समोर वासोटा दिसू लागला. आणि काही मिनिटांत बोटी जिथे लागतात तिथे पोहचलो, पटापट सगळे उतरून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कमानीखाली जमा झालो. सगळ्या ग्रुपचा एकत्र फोटो काढून, वनविभागाच्या तिकीट खिडकी /प्रवेशद्वारापाशी येऊन थांबलो. तिथली गर्दी बघून तर माझे डोळेच फिरले...सिंहगड, लोहगडला लाजवेल अशी गर्दी होती. 'वासोटा' दुर्गमगड आहे...निर्जन आहे... वगैरे बऱ्याच वर्षांपासून ऐकून होतो पण माझे समज मागे पडले. 

         जवळपास पाऊण-एक तासाच्या प्रवेशद्वाराच्या कंटाळवाण्या थांब्यानंतर अखेर ट्रेक सुरु झाला...त्यातल्या त्यात तिथे ग्रुपचं थोडंसं स्ट्रेचिंग करून घेतलं हीच काय ती जमेची बाजू... सुरुवातीला काहीशा विरळ झाडाझुडपांनंतर.. एक ओढा लागला... पावसाळ्यात भरपूर पाणी असत असणार , अशा खुणा जाणवत होत्या ..ठिकठिकाणी अधे-मध्ये थोडं पाणी होतं तसं.. आणि ओढ्यातल्या गोल-गरगरीत दगडांमुळे फोटो काढायचा स्पॉट मिळाला होता खरा.. काही मंडळींचं चालू होतं फोटोसेशन.. आम्ही मात्र काढता पाय घेतला.. 

(ट्रेकच्या सुरुवातीला लागणारं मारुती मंदिर)

लगेचच पुढे हनुमानाची दगडात कोरलेली शेंदूर लावलेली मूर्ती दिसते.. पाया पडून ट्रेक सुरु ठेवला .. आता काहीशी दगड-गोट्यांमधली बनलेली वाट होती आणि झाडांची गर्दी वाढली होती...प्रचंड मोठी झाडे आणि त्यावर लांबच लांब पसरलेल्या वेली  ... अशातून आमचा प्रवास सुरु होता. काही वेळाने पायऱ्या लागतात... तिथेही अशाच घनदाट जंगलातून जावे लागते... डिसेंबर जरी असला तरी चांगलाच घाम निघत होता... त्यात ट्रेकची सवय मोडलेली...थांबत बसत..ट्रेक सुरूच होता...

 ग्रुपमध्ये सगळ्या प्रकारची जनता होती. हौशी-गौशी.. हाडाचे ट्रेकर .. त्यामुळे ग्रुप विखुरला होता, काही अगदीच पुढे .. काही अगदीच मागे.. अधून मधून आमचं पण फोटो सेशन चालू होतंच म्हणा... ऑर्गनायझर्स मधील लोक divide झाले होते. काही सर्वांत पुढे .. काही शेवटच्यांना सोबत न्यायला मागे..  वाटेत एक स्पॉट आहे, भला मोठा खडक आहे, तिकडे चढून फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. 

(कितीही दमलेला असलं तरी फोटोसाठी हसायला लागतं भाऊ)

        भलेही दमछाक होत होती, घामेजलो होतो पण ती जंगलातील वाट, झाडी, मधूनच दिसणारे डोंगर आणि वासोटा सर करायची ओढ.. नवी उमेद देत होते आणि आता आम्ही 'वासोटा' नावाची बाणाकृती पाटी लावलेल्या ठिकाणी पोहचलो. तिथे त्या पाटीबरोबर फोटो काढला हे वेगळं सांगायची गरज नाही. 

       जंगल संपून आता चढण चढून थांबलो आणि मागे वळून बघितलं तर लक्षात आलं, बरंच अंतर पार केलंय. 'शिवसागर' जलाशय बराच दूर दिसत होता आणि मधल्या घनदाट अंदाज आला. आता ट्रेकचा शेवटचा टप्पा होता. 

(दूरवर दिसणारा शिवसागर जलाशय)

 उजवीकडे गडावरील कुठलासा बुरुजसदृश भाग होता, तर डावीकडे बाबुकडा होता. थोड्याच वेळात दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसू लागल्या, ज्या आपल्याला उध्वस्त प्रवेशद्वाराशी आणून सोडतात. गडावर समोरच लगेच आणखी एक हनुमंताचं देऊळ आहे. 

पाया पडून सगळं ग्रुप समोर मोठं झाड, सावली पाहून बॅगा टाकून विसावा आणि जेवणासाठी जमा झाला. येताना आपापला आणलेला खाऊ  आणि ऑर्गनायझर्सनी दिलेली थेपल्याची पाकिटं उघडली गेली. बघता बघता सर्वांनीच जे काही होतं.. बिस्किटं, चिवडा सगळ्याचा अक्षरशः फडशा पडला. अशा प्रोफेशनल ग्रुप्स सोबत येण्याचे काही फायदे-तोटे असतातच... काही subgroups बनले ते इतरांशी फार काही बोलत नव्हते...तर एकटे दुकटे पण बोलके लोक.. नवीन ओळखी करून घेत होते...शेअर करत होते.

            अर्ध्या-पाऊण तासाच्या विसाव्यानंतर उत्तरेकडील बुरुजाकडे निघालो. वाटेत महादेवाचं पुरातन मंदिर आहे, दर्शन घेतलं. अगदी पक्कं बांधकाम आहे अजूनही. कित्येक उन्हाळे-पावसाळे झेलत उभं असावं. वेगवेगळ्या अँगलने फोटोज घेतले. 

(गडावरचं शिवालय)

       मंदिराच्या बाजूलाच एक भग्न वास्तू दिसते, वाडा असावा अथवा दरबार ठिकसं काळात नाही. पण तिथे बरंच गवत माजलेलं दिसतं. पुढे  बुरुजावर जाऊन आजूबाजूचा परिसर न्याहाळताना सह्याद्रीच्या रौद्रतेची जाणीव होते. एका बाजूला 'शिवसागर' जलाशय, जंगल आणि तीन बाजूंनी सह्याद्रीचे उंचच उंच डोंगर आणि त्याचे खोल -सरळसोट कडे... बुरुजाच्या उत्तरेला एक पॉईंट आहे, तिकडे जाताना एक ४-४.५ फुटाच्या दगडी कमानीतून जावे लागते. शेवटच्या पॉईंटवरून वायव्येकडे 'नागेश्वर' मंदिर/डोंगर दिसतो. तिथे एकसारखे २ सुळके दिसतात. एक 'नागेश्वर' आणि एकाला 'खोटा नागेश्वर' म्हणतात अशी काही माहिती तिथे असणाऱ्या एकाने दिली. त्याच दिशेला 'महिमंडणगड' असल्याचंही त्या व्यक्तीने सांगितलं. 

(लांब दिसतोय तो नागेश्वर आणि अलीकडचा खोटा नागेश्वर)

इथे एक जाणवतं ..रायगड, राजगड, तोरणा, सिंहगड, लोहगड वगैरे किल्ल्यांवर भक्कम बांधलेले बुरुज, माच्या, तटबंदी दिसतात, तसं इथं फार दिसत नाही. मुख्यतः टेहळणी आणि कारागृह म्हणून ह्या किल्ल्याचा वापर होत होता असं वाचण्यात आहे. 

(एक पॅनोरमा)

             हनुमान मंदिराकडे परतीची वाट धरली, वाटेत बुरुजावर ग्रुपचा फोटो झाला. तिथेच ऑरगनायझर मधील एक विशाल भिलारे ह्या मित्राने, आपल्या छत्रपतींची शिवगर्जना दिली. त्याच्या त्या खड्या आवाजात, वासोट्यावर, सह्याद्रीत एक वेगळाच उत्साह, जोश जाणवला. 

दोन क्षण डोळे मिटून, महाराजांचे, मावळ्यांचे पराक्रम आठवून, मनातल्या मनात वंदन करून, हनुमान मंदिराकडे निघालो. मंदिराची बरीच पडझड झालेली दिसते, मूर्ती तशी उघड्यावरच आहे, चौकट आणि चहूबाजूच्या भिंती तेवढ्या शाबूत आहेत. 

(हेच ते हनुमानाचं मंदिर)

आता मारुतीरायाच्या पाय पडत असू तर डावीकडची वाट आपल्याला गडाच्या दक्षिणेकडच्या बुरुजाकडे घेऊन जाते. तर उजवीकडे पण एक पाऊलवाट दिसते, ती एका वाड्याच्या अवशेषांकडे घेऊन जाते असं कुणीतरी तिथे सांगितलं. पण बरीच दाट झाडी दिसत होती आणि कुणी जास्त जाताना दिसलं नाही त्यामुळे आम्हीही विचार सोडला आणि मंदिराच्या डावीकडे पावलं वळवली.
              ५-१० मिनिटांत आपण चुन्याच्या घाण्यापाशी पोहचतो . पुढे काही क्षणातच पाण्याच्या टाक्या लागतात.  चुन्याच्या घाणा आणि लगेचच पाण्याचे टाक्या असण्याचे कारण म्हणजे गडावर कसलंही बांधकाम करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, त्या एकत्र करणं सोपं जावं.. टाक्या करताना मिळालेला दगड, चुना आणि पाणी. इथून पुढे काही फारशी अशी पायपीट करावी लागत नाही. वासोट्याचा शेवटचा बुरुज आहे हा, हाच तो 'बाबुकडा'. ह्या कडयाच्या नावाबद्दल काही ऐकण्यात नाही फार. समोरचा डोंगर जवळपास सारख्याच उंचीचा आहे पण... दोन्ही डोंगर एका खोल दरीने विभागले गेले आहेत.. हि दरी दूरवर तशीच पसरलेली दिसते. समोरचा हा डोंगर म्हणजे 'जुना वासोटा' असल्याचं सांगतात. त्याचा बराच भाग ढासळल्याचं स्पष्ट जाणवतं. हा जो ढासळेल भाग आहे, त्यामुळे 'U' आकार तयार झाला आहे आणि त्याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येत. (टीप- हरिश्चंद्रगड अजून पाहिलेला नाहीय पण कित्येक फोटो/व्हिडिओज पाहिलेत). हा भाग बघता क्षणी चांगलीच धडकी भरवतो. 

(इथे सह्याद्रीच्या रौद्रतेची जाणीव होते)

तिथे काही फोटोज काढले. दुपारचे ३ वगैरे वाजले असतील... ऊन बऱ्यापैकी होतं.. पुन्हा सगळा ग्रुप हनुमान मंदिरापाशी एकत्र येऊन, गड उतरायला सुरुवात केली. उतरताना फारसा त्रास नाही झाला..दीड दोन तासांत आम्ही बोटींच्या थांब्यापाशी होतो . लहान दिवस... एव्हाना उन्हं उतरायला सुरुवात झाली होती. बोटीचा परतीचा प्रवास सकाळच्या मानाने शांततेतच झाला. 

 

मावळतीच्या दिनकराचं ते रूप..  शिवसागर जलाशयात... सह्याद्रीच्या कुशीत.. सामावताना विलक्षण मोहक दिसत होत..            

 मुक्कामाच्या ठिकाणी पोहचेपर्यंत अंधार पडला होता.. विभा बिश्तने बाकी जेवणाची वगैरे तयारी करून ठेवली होती. सगळ्यांना कडकडून भूका लागल्याच होत्या, सगळ्यांनी जेवणावर ताव मारला आणि आवराआवर करायला घेतलं. भयंकर थकवा आल्याने कधी बसमध्ये जाऊन बसलो आणि कधी बस निघाली, परतीच्या प्रवासाचं काही एक आठवत नाही. मध्यरात्री कधीतरी पुण्यात पोहचल्याचं आठवतंय.
             'ट्रेक वासोटा' हा एक सुंदर अनुभव म्हणून कायमच लक्षात राहील. बऱ्याचदा ट्रेक पावसाळ्यात ..हिवाळ्याच्या सुरुवातीला होतात...ह्या ट्रेकमध्ये सह्याद्रीचं वेगळं रूप पाहायला मिळालं... मुख्य म्हणजे बऱ्याच वर्षांची इच्छा पूर्ण झाली होती, इतक्या जवळ असूनही न जाता आल्याची खंत होती, ती दूर झाली.